Ad will apear here
Next
याद न जाए बीते दिनों की...
अभिनेते राजेंद्रकुमार यांचा स्मृतिदिन (१२ जुलै) नुकताच होऊन गेला, तर २० जुलै हा त्यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांच्यावर चित्रित झालेल्या ‘याद न जाए बीते दिनों की...’ या गाण्याचा...
........
गीतकार सरस्वतीकुमार दीपक यांच्या जुलै महिन्यातील जन्म व मृत्यूच्या तारखांचा योगायोग मागील लेखात आपण पाहिला! तसाच जुलै महिन्यातील आणखी एक योगायोग म्हणजे अभिनेते राजेंद्रकुमार यांचा जन्म आणि मृत्यू. २० जुलै १९२७ ही त्यांची जन्मतारीख आणि १२ जुलै १९९९ रोजी ते हे जग सोडून गेले. 

राजेंद्रकुमार हा आम्हा बहीण-भावंडांच्या बालपणाच्या दिवसांतील अत्यंत आवडता नट! त्याचा अभिनय वगैरे बघण्याचे ते वय नव्हते. त्याचे धारदार लांब नाक, त्याचे देखणेपण आणि त्याची गाणी हेच त्या वयातील आकर्षण होते. आणि अशा आमच्या जीवनातील एकेकाळच्या आवडत्या नटाच्या निधनाच्या वेळी एक वेगळा योगायोग घडला. माझ्या वडिलांचे निधन १९९३मध्ये झाले. त्या दिवशी ज्येष्ठ अमावास्या होती! आणि राजेंद्रकुमार १२ जुलै १९९९ रोजी गेले, त्या दिवशीही ज्येष्ठ अमावास्या होती. या वर्षीही १२ जुलैला ज्येष्ठ अमावास्या होती. प्रिय व्यक्तींच्या स्मृतींचा तो दिवस - ‘याद न जाए बीते दिनों की’ असे म्हणायला लावणारा तो दिवस! 

राजेंद्रकुमारची याद आमच्या जीवनात काय होती? १९६० ते १९७०चे ते दशक! मद्रासच्या जेमिनी, एव्हएम आदी चित्रसंस्थांचे कौटुंबिक कथानकाचे चित्रपट तेव्हा घरातूनही आवर्जून दाखवले जायचे! मग राजेंद्रकुमार कधी ‘तेरी प्यारी प्यारी सूरत को...’ म्हणत ‘ससुराल’मधून भेटायचा, तर कधी ‘हमने जफा न सीखी...’ असा विशाद मांडत ‘जिंदगी’मधून रडवायचा. राजा-राणीच्या कथानकात तो तलवारबाजी करून ‘बहारों फूल बरसाओ...’ म्हणायचा तो ‘सूरज’ पुन्हा एकदा आजही बघावासा वाटतो. 

राजेंद्रकुमारचे असे अनेक चित्रपट त्या वयात बघायला खूप खूप आवडायचे. जसजसे वय वाढू लागले, तेव्हा कळले की आता पाकिस्तानात असलेल्या सियालकोटमध्ये २० जुलै १९२७ रोजी जन्मलेल्या राजेंद्रकुमारांचे कुटुंब फाळणीच्या वेळी दिल्लीला आले. दिल्लीत आल्यावर त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ‘बीकॉम’चे शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. त्यानंतर मनासारखी नोकरी मिळावी म्हणून ते मुंबईत आले; पण डोळ्यापुढे स्वप्न होते चित्रपटात हिरो बनण्याचे. 

दिग्दर्शक एच. एस. रावल यांच्याकडे त्यांनी सहायक दिग्दर्शक म्हणून नोकरी स्वीकारली. पतंग, सगाई, पॉकेटमार या चित्रपटांकरिता सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत असतानाच ‘रणजित मूव्हीटोन’च्या ‘जोगन’ चित्रपटात त्यांनी एक छोटीशी भूमिका केली. पुढे १९५५मध्ये देवेंद्र गोयल यांच्या ‘वचन’ चित्रपटात त्यांना नायकाची भूमिका मिळाली. त्यातून त्यांना प्रसिद्धी मिळाली व पुढे चित्रपटही मिळत गेले. त्यांनी काम केलेल्या चित्रपटांची एकूण संख्या सव्वाशे आहे. त्यापैकी पन्नासेक चित्रपटांची रौप्यमहोत्सव साजरे केले आहेत. त्यामुळे त्यांना ‘ज्युबिली कुमार’ असे संबोधले जायचे. 

राज-दिलीप-देव या त्रिमूर्तीच्या काळातही राजेंद्रकुमारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यश मिळवत होते. त्या काळातील सगळ्या टॉपच्या नायिकांबरोबर त्यांनी काम केले. मीना कुमारी, वहिदा रहेमान, आशा पारेख, नूतन, सायरा बानू, साधना, माला सिन्हा, हेमा मालिनी, रेखा इत्यादी! पण मला राजेंद्रकुमार व वैजयंती माला ही जास्त अनुरूप जोडी वाटते. 

राजेंद्रकुमार यांची चित्रपटगीतेही अशीच वेड लावणारी होती. शंकर-जयकिशन यांच्या संगीतातील गीतांचा त्यामध्ये जास्त वाटा होता; पण त्यांच्याशिवाय नौशाद, रवी, कल्याणजी आनंदजी, वसंत देसाई या संगीतकारांनीसुद्धा राजेंद्र कुमार यांच्यासाठी सुंदर गीते दिली होती. 

चित्रपटसृष्टीतील एक शालीन व्यक्तिमत्त्व म्हणून राजेंद्रकुमार यांचे नाव घेतले जायचे! ‘संगम’, ‘मदर इंडिया’, ‘दिल एक मंदिर’ अशा चित्रपटांतून, समोर अभिनयातील तुल्यबळ नायक-नायिका असूनही राजेंद्रकुमार आपली भूमिका त्यांच्या परीने उत्कृष्ट करून गेले. 

मृत्यू! एक अप्रिय विषय! १२ जुलै १९९९ला राजेंद्रकुमार यांचे निधन झाले; पण तत्पूर्वी ते चित्रपटातील भूमिका साकार करताना कथानकाची गरज म्हणून अनेक वेळा मृत्यूला सामोरे गेले. ‘संगम’ चित्रपट तर त्यांच्या अस्थींचे विसर्जन करूनच संपतो. ‘अमन’ मध्ये त्यांची अंत्ययात्रा आपण पडद्यावर बघतो, तर ‘दिल एक मंदिर’मध्ये ‘जानेवाले कभी नहीं आते...’ हे गीत त्यांच्या मृत्यूवर रुदन करणारे गीत म्हणून चित्रित झाले आहे. 

दोन दशके रोमँटिक नायक रंगवणारा हा अभिनेता उतारवयामध्ये ‘साजन बिना सुहागन’, ‘दो जासूस’, ‘बिन फेरे हम तेरे, ‘सुनहरा संसार’, ‘ओ बेवफा,’ ‘धनदौलत’ इत्याजी चित्रपटांतूनही दिसून आला. आपल्या मुलाला ‘नायक’ बनवून त्यांनी ‘लव्हस्टोरी’ चित्रपट बनवला. त्यांचा मुलगा कुमार गौरव ऊर्फ बंटी’ हा चॉकलेट हिरो होता. ‘लव्हस्टोरी’ यशस्वी ठरला; पण त्या नंतर...? वडिलांसारखे यश मुलाला मिळाले नाही. 

१९९७-९८मध्ये राजेंद्रकुमार यांना रक्तदाबाचा त्रास सुरू झाला होता. आणि १९९९मध्ये १२ जुलैला आपल्या रौप्यमहोत्सवी चित्रपटांच्या असंख्य आठवणी आपल्या चाहत्यांच्या मनात ठेवून हा कलावंत महायात्रेला गेला. इंग्रजी जुलै महिना आणि मराठी ज्येष्ठ महिन्याचा शेवट... कोसळणारा वरुणराज, पावसाळ्यातला हवेमधील गारठा, ओले, कुंद वातावरण... मनात कल्लोळ माजवते. आठवणींची मालिका सुरू होते आणि कानावर हार्मोनियमची धून येते, मोहम्मद रफींचा स्वर येतो (हेही व्यक्तिमत्त्व जुलै महिन्याशी निगडित)... शब्दप्रभू शैलेंद्रचे शब्द काळजातल्या खळबळीला वाट देतात -

जा के ना आए जो दिन 
दिल क्यूँ बुलाए ,उन्हे दिल क्यूँ बुलाए

(माझ्या आयुष्यातील सुवर्ण दिनांच्या स्मृती) त्या दिवसांच्या आठवणी जात नाहीत (पुसून टाकता येत नाहीत) आणि त्या गेलेल्या सुखद दिवसांना पुन्हा बोलावले तरी ते येत नाहीत. हे कळवूनही माझे मन त्या गत दिवसांना का बरे बोलावते? 

खरेच -

दिन जो पखेरू होते पिंजड़े में मैं रख लेता 
पालता उनको जतन से मोती के दाने देता 
सीने से रहता लगाए

(ते सुखद) दिवस जर पक्षी असते, तर त्यांना मी पिंजऱ्यात ठेवून दिले असते (आणि मला पाहिजे तेव्हा त्यांचा आनंद पुन्हा पुन्हा लुटला असता.) त्या सुखद दिवसरूपी पक्षांना मी काळजीपूर्वक सांभाळले असते, मोत्याचा चारा त्यांना दिला असता आणि त्यांना सतत कवटाळून बसलो असतो. (पण हाय रे दुर्दैवा. ते पक्षी नाहीत ना! ते दिवस आहेत आणि आता ते निघून गेले आहेत.)

गत दिवसांची त्रस्त आठवण काव्यात मांडत असताना गीतकार शैलेंद्र यांनी या वरील कडव्यात हे असे उपमा अलंकारयुक्त वर्णन केले आहे. या गीताचे पुढील कडवे मात्र थोडेफार चित्रपटातील कथानकाच्या अनुषंगाने लिहिले आहे. नायक राजेंद्र कुमार व नायिका मीनाकुमारी हे एकमेकांना भेटत असतात. एकमेकांवर नितांत प्रेम करत असतात. परंतु पुढे काही अडचणींमुळे दोघे दुरावतात व मीनाकुमारीचा विवाह राजकुमारबरोबर होतो. तिच्या आठवणीत राजेंद्रकुमार एकाकी जीवन जगत असतो. तिचा एक फोटोसुद्धा त्याच्याजवळ असतो. 

आणि त्यामुळेच शैलेंद्र पुढील कडव्यात लिहितो -

तस्वीर उनकी छुपा के रख दूँ जहाँ जी चाहे 
मन में बसी ये सूरत लेकीन मिटे न मिटाए 
कहने कि है वो पराए...

(माझ्या प्रियेचा) फोटो/छायाचित्र जरी मी कोठेही लपवून ठेवले, दृष्टीआड ठेवले, तरी माझ्या मनात तिचा जो चेहरा बसून राहिला आहे, तो विसरून जावे म्हटले, तरी मी विसरून जाऊ शकत नाही. तशी ती आता परक्याची/दुसऱ्याची झाली आहे; पण ते नावापुरतेच. (खरे तर ती माझीच आहे.)

दोनच कडव्यांचे हे गीत; पण हृदयस्पर्शी शब्दरचना, त्याला साजेशी चाल व संगीत आणि मोहम्मद रफींचा विशाद व्यक्त करणारा स्वर... सारेच सुनहरे...

अशी सुनहरी गीते राजेंद्रकुमार यांनी पडद्यावर गायली. समीक्षकांच्या नजरेत तो अभिनयनिपुण नव्हता; पण तरीही तो पडद्यावर बघावासा वाटायचा. आम्हाला सिनेमाचे वेड या कलावंताने लावले. आमच्या बालपणाच्या वयातला तो आमचा साथीदार होता. तो गेला, त्याचे गाणे म्हणणारा रफी गेला, त्याची गाणी संगीतात बांधणारे शंकर-जयकिशन गेले. गाणी लिहिणारे शैलेंद्र, हसरत गेले! पण याद न जाए बीते दिनों की....

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZSSBQ
Similar Posts
मोहब्बत जिंदा रहती है... अनेक श्रवणीय गीते दिलेले संगीतकार हंसराज बहल यांचा १९ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांनी संगीत दिलेल्या ‘मोहब्बत जिंदा रहती है...’ या गीताचा...
कभी खुद पे कभी हालात पे... ‘हम दोनों’च्या लोकप्रिय गाण्यांसह अनेक गाण्यांना श्रवणीय संगीत देणारे संगीतकार जयदेव यांचा जन्मदिन तीन ऑगस्टला होऊन गेला. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज आस्वाद घेऊ या त्यांनी संगीत दिलेल्या ‘हम दोनों’मधीलच ‘कभी खुद पे कभी हालात पे...’ या गीताचा...
जिंदगी ख्वाब है.... जुन्या काळात अनेक चित्रपट आपल्या लाजवाब अभिनयाच्या मोत्यांनी सजवलेले कलावंत म्हणजे मोतीलाल राजवंश. चार डिसेंबर हा त्यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदराच्या आजच्या भागात आस्वाद घेऊ या मोतीलाल यांच्या सुंदर अभिनयाने नटलेल्या नि शैलेंद्र यांनी लिहिलेल्या ‘जिंदगी ख्वाब है’ या गीताचा...
गम की अंधेरी रात में... हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान गीतकार जाँ निसार अख्तर यांचा आठ फेब्रुवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांनी लिहिलेल्या ‘गम की अंधेरी रात में...’ या गीताचा...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language